मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीसाठी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशेषत: बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर विशेष जोर दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करण्याचे आदेश ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी हा बालेकिल्ला शाबूत ठेवावा. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा आपला पक्ष लढवणार आहे. या ठिकाणी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा. असे सांगून उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.
विधानसभेत भाजप उमेदवाराला पाडा!
बुलढाण्यातील विधानसभा मतदारसंघात जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील त्याचा पराभव करण्याची रणनीती आतापासूनच आखा आणि तयारीला लागा, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ १९९९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून सुरुवातीला १९९९ आणि २००४ ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते, तर २००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झाले होते.
पहिल्या टप्प्यात ३२ मतदारसंघांचा आढावा
उद्धव ठाकरेंनी पहिल्या टप्प्यात ३२ मतदारसंघांचा आढावा घेतला होता. ते मंगळवारपासून २६ ऑगस्टपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा या मतदारसंघांचा समावेश आहे.