महिलेवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली.
महिलेवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

मुंबई : गोरेगाव येथून स्वत:च्या घरी रिक्षातून जाणाऱ्या एका महिलेवर रिक्षाचालकाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन महिन्यांपासून फरार असलेल्या इंद्रजित देवेंद्र सिंह नावाच्या आरोपी रिक्षाचालकास आरे पोलिसांनी अटक केली. मे महिन्यांत या महिलेवर इंद्रजीतने लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

पिडीत महिला गोरेगाव येथे राहत असून तिची एक नातेवाईक सीबीडी बेलापूर येथे राहते. मे महिन्यांत सीबीडी बेलापूर येथून लोकलने गोरेगाव आणि नंतर रिक्षातून घरी जात होती. आरे जंगलातून जात असताना रिक्षाचालकाने एका निर्जनस्थळी रिक्षा आणून या महिलेशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण, शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

अलीकडेच तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेची जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार, मारहाण करून अश्‍लील संभाषण करणे, शिवीगाळ करून धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. आरोपीचा शोध सुरू असताना दोन महिन्यानंतर इंद्रजीत सिंह या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर तो त्याच्या गावी पळून गेला होता. गावाहून मुंबईत आल्यानंतर त्याला कुर्ला रेल्वे स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली.

logo
marathi.freepressjournal.in