मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारी लागा, असे निर्देश देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. त्यावेळीच शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. आता जर ही जागा भाजपकडे आली तर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेलविरुद्ध ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके, असा सामना होण्याची शक्यता आहे.
स्वीकृती शर्मांची तयारी सुरू; शिंदे गटाचा दावा
शिवसेना शिंदे गटाकडून एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच शिंदे गटाच प्रवेशही केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा आणि भाजपचे मुरजी पटेल या दोघांपैकी कोणाला तिकीट मिळते हे बघावे लागेल.