
मुंबई : महात्मा गांधीजींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर चौफेरी टीका झाली. भिडेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. यावरून बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली. यावर ‘‘संभाजी भिडे गुरूजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. पण, महापुरूषांवर असे वक्तव्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. पण, त्याचवेळी काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्रात वीर सावरकरांवरही वक्तव्य होते. त्यामुळे काँग्रेसच्या शिदोरीवरही गुन्हा दाखल होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केल्यानंतर जोरदार गदारोळ माजला. आक्रमक झालेल्या काँग्रेस सदस्यांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.
‘‘मनोहर कुलकर्णीला भिडे गुरूजी म्हटले जाते, ती व्यक्ती अमरावतीत आली होती. त्यांना मी तिथे विरोध केला. महात्मा गांधी वा महात्मा जोतिबा फुलें विरोधात कोणी बोलले तर खपवून घेतले जाणार नाही. त्यानंतर मला ट्विटरवर धमकी आली. तो दाभोळकर असाच ओरडत होता, मग एक दिवस त्याला जन्नतमध्ये पाठवला,’ अशी धमकी आली. धमकी देणारा हा माणूस सांगतोय मी धारकरी आहे. कैलाश सूर्यवंशी त्याचे नाव आहे. ते दाभोळकरांना मारल्याची कबुली देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,’’ अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
अनेक आमदारांना धमकी आल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘मलाही धमकीचे फोन व ईमेल आले. मी पोलिसांत तक्रार केल्यानंतर कराड पोलिसांनी त्याला अटक करून जामिनावर सोडले. यामागे कोणी सूत्रधार आहे का. संभाजी भिडे हा फ्रॉड माणूस आहे. त्याची डिग्री काय, कुठे शिक्षण घेतले. हा माणूस सोने गोळा करत आहे. वर्गणी गोळा करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे संस्थेची नोंदणी करावी लागते. ही व्यक्ती लोकांची दिशाभूल करते आहे. बहुजन समाजाची मुले फरफटत जावीत, असा त्याचा उद्देश आहे. दाभोलकरांचा खून केला, असे म्हणत असेल तर त्याला अटक केली का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यावेळी फडणवीस यांनी भिडेंचा गुरूजी म्हणून उल्लेख केल्याने काँग्रेस सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. ते आम्हाला गुरूजी वाटतात. काय अडचण आहे. त्यांचे नावच भिडे गुरूजी आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी नोटीस स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. जितेंद्र आव्हाड यांनी देखील तक्रार केली असून त्याचाही पोलीस तपास करत आहेत. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात अवमानजनक वक्तव्य केले तर केस फाईल होईल,’’असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अमरावती सभेचा व्हीडीओ नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘संभाजी भिडे यांनी अमरावती येथे भाषण केले. त्यात त्यांनी सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्या आशयावरून काही कमेंट केल्या. ‘द कुराण अँड द फकीर’ नावाच्या एका पुस्तकातील उतारे वाचण्यात आले. अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलै रोजी संभाजी भिडे व अन्य दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे. अमरावती सभेचे व्हीडीओ उपलब्ध नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. माध्यमात जे फिरतात, ते विविध वेळचे आहेत.’’