मुंबईत कुष्ठरोग निर्मूलनासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान शोध मोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत तब्बल ३२ लाख ७४ हजार ८८ जणांची तपासणी केली असता ८१ नवीन कुष्ठरोग रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने दिली.
मुंबई कुष्ठरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेत ३२ लाख ७४ हजार ८८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८,५०९ संशयीत आढळले असून त्यापैकी ८१ जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.