पावसाळी आजारांचा धोका; गतवर्षीच्या तुलनेत H1N1, चिकुनगुनिया, मलेरिया, लेप्टोच्या रुग्णांत मोठी वाढ; खबरदारी घेण्याचे आवाहन

मुंबईत यंदा ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग सा‌वध झाला आहे.
पावसाळी आजारांचा धोका; गतवर्षीच्या तुलनेत H1N1, चिकुनगुनिया, मलेरिया, लेप्टोच्या रुग्णांत मोठी वाढ; खबरदारी घेण्याचे आवाहन
Published on

मुंबई : मुंबईत यंदा ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग सा‌वध झाला आहे. प्रामुख्याने लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, चिकुनगुनिया आणि एचवनएनवन आदींबाबत नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईकरांना केले आहे.

आरोग्य विभागाने गुरुवारी याबाबत आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एचवनएनवन फ्लूचे ११६ रुग्ण आढळले होते. तर, यंदा तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातच या आजाराच्या ११९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी ऑगस्टमध्ये चिकुनगुनियाचे ३५ रुग्ण मुंबईत आढळले होते. तर, यंदा ऑगस्टच्या १४ तारखेपर्यंतच ८४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पालिका हद्दीत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गॅस्ट्रोचे ९७८ रुग्ण नोंदले गेले होते. यंदा १४ तारखेपर्यंत हा आकडा ५३४ वर पोहचला आहे.

अन्य आजारांचा मासिक संख्येचा विचार करता यंदा ऑगस्टच्या १४ तारखेपर्यंत मलेरियाचे ५५५ (गतवर्षी १०८०), डेंग्यूचे ५६२ (गतवर्षी ९९९), लेप्टोस्पायरोसिसचे १७२ (गतवर्षी ३०१), हिपेटायटिस ए आणि इ या प्रकारांचे ७२ (गतवर्षी १०३) रुग्ण नोंदले गेले आहेत.

चिकुनगुनिया, डेंग्यू या आजारांच्या प्रसारासाठी एडिस प्रजातीचे डास कारणीभूत ठरतात. साचून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात आणि परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पाणी उकळून प्या...

ताप आल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतः औषधे घेणे टाळावे, आणि घराजवळच्या मनपा आरोग्य केंद्रात, दवाखान्यात, रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. रस्त्यावरील, उघडे अन्न खाणे टाळा. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझरचा वापर करा. पाणी उकळून प्या, असेही सांगण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. शिंकताना, खोकताना आपले नाक टिश्यू किंवा रुमालाने झाका. साबणाने, पाण्याने वारंवार हात धुवा. डोळे किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा. मुखपट्टीचा वापर करा, अशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘भाग मच्छर भाग’ जनजागृती मोहीम

यासंदर्भात पालिकेने ‘भाग मच्छर भाग’ ही व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या संदेशांचा प्रसार केला जात आहे. सध्या अधूनमधून होणाऱ्या पावसामुळेही अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. पालिकेने या महिन्यात ३१,५०४ ठिकाणी पाहणी केली असता २४२६ ठिकाणी ॲनाफिलीस डासांची उत्पत्ती होत असल्याचे दिसून आले. डेंग्यू नियंत्रणासाठी पालिकेने सहा लाख ३२९७ घरांची तपासणी केली. त्यापैकी १४९६ ठिकाणी डासांची उत्पत्ती सुरू असल्याचे दिसून आले. पालिका क्षेत्रात ८९०१ धुरीकरण यंत्राद्वारे २४,६९४ इमारतींमध्ये धुरीकरण करण्यात आले. याशिवाय तीन लाख ५६ हजार ४६५ झोपड्यांमध्येही धुरीकरण केले आहे. लेप्टो स्पायरोसिसच्या नियंत्रणासाठी एकूण १९ हजार ८०२ उंदीर मारण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in