मुंबईत उघडी गटारे, मॅनहोलचा धोका कायम; अंधेरीतील दुर्घटनेमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जोरदार पावसात उघडी गटारे, नाले, मॅनहोल मुंबईकरांसाठी अजूनही असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे.
मुंबईत उघडी गटारे, मॅनहोलचा धोका कायम;
अंधेरीतील दुर्घटनेमुळे प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Published on

मुंबई : जोरदार पावसात उघडी गटारे, नाले, मॅनहोल मुंबईकरांसाठी अजूनही असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसात अंधेरी वेरावली जलाशया जवळच्या उघड्या गटारात पडून एका महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मुंबईतील नाले, उघडी गटारे, पर्जन्य जलवाहिन्या, मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पालिकेचे पर्जन्य जलवाहिन्या खाते, मलनिस्सारण वाहिन्या खाते, मलनिस्सारण प्रचालन खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी अशा विविध खात्यांशी संबंधित मुंबईत विविध ठिकाणी एक लाखावर मॅनहोल आहेत. देखभाल-दुरुस्ती आणि सफाईसाठी कंत्राटदार, पालिका कर्मचाऱ्यांकडून हे मॅनहोल उघडण्यात येतात. मात्र हे मॅनहोल उघडे राहिल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. उघडी मॅनहोल सुरक्षित करण्याबाबत न्यायालयानेही पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

अंधेरीत गटारात पडून महिलेचा मृत्यू

मुंबईत बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसात अंधेरी पूर्व येथे उघड्या गटारात पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर पडझडीच्या दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले. या घटनेची महापालिकेकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

अंधेरी पूर्व एमआयडीसीमधील सिप्झ गेट नंबर-८ येथे जलाशय इमारतीनजीक एक महिला पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारात पडली. या ठिकाणी भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. रात्री नऊच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षातून अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने तेथे धाव घेऊन या महिलेला गटारातून बाहेर काढले. या ४५ वर्षीय महिलेला कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आले, परंतु तिचा आधीच मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी जाहीर केले. मृत महिलेचे नाव विमल अनिल गायकवाड असे आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी समितीदेखील नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ-३ चे उपआयुक्त देवीदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे उर्वरित दोन सदस्य आहेत.

logo
marathi.freepressjournal.in