मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला ; आठवडाभरात आठ रुग्ण आढळले

मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे
मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला ; आठवडाभरात आठ रुग्ण आढळले

कोरोनाच्या चौथ्या लाटेला उतरती कळा लागल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १० ते १७ जुलै या आडवड्यात साथीच्या आजारांत दुपटीने वाढ झाली असून, या सात दिवसांत मलेरियाचे १२४, डेंग्यूचे १४, लेप्टोचे ६, गॅस्ट्रोचे १६४ आणि स्वाईन फ्ल्यूच्या ८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे टेन्शन वाढले असून, थंडीत पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते १७ जुलै या १७ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ व स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पावसाळी आजार रोखण्यासाठी मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होणार नाही, यासाठी पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे. १ ते १७ जुलै या १७ दिवसांत मलेरियाचे एकूण २४३, गॅस्ट्रोचे ३४०, डेंग्यूचे ३३, स्वाईन फ्ल्यू आणि लेप्टोचे प्रत्येकी ११ रुग्ण आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. चिकनगुनियाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.

डेंग्यू, लेप्टोचा आजार पसरण्याचा धोका अधिक असून घर, दुकान व परिसरात पाणी साचू देऊ नये. साथीचे आजार रोखण्यासाठी ७ ते १७ जुलैदरम्यान सात लाख ७८ हजार ७०९ घरांत ९५ हजार २१८ गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in