मुंबई : 'ग्रोइंग सिटीज, ग्रीनर कॅनोपीज' या संकल्पनेवर आधारित दुसरी आंतरराष्ट्रीय अरबोरिकल्चर परिषद वृक्षवर्धन २०२६ - मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे उद्घाटन सोहळ्याने सुरू झाली. अमेनिटी ट्री केअर असोसिएशन (ATCA) आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेत मुंबई महापौर रितू तावडे यांनी उद्घाटन सत्रास उपस्थिती दर्शवली.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक आणि ATCA संघटनेचा आजवरचा प्रवास यावर सुरुवातीला संचालक वैभव राजे यांनी भूमिका मांडली. संचालक नकुल सावनी, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे मुख्याधिकारी आर्यन पांडे आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
महापौर तावडे म्हणाल्या, बोरिकल्चर परिषदेच्या माध्यमातून मला हे स्पष्ट झाले की, माणसाच्या हेल्थ रिपोर्टप्रमाणे झाडाचाही हेल्थ रिपोर्ट तयार होऊ शकतो. उंच इमारतींचा विकास म्हणजे फक्त विकास नाहीतर या विकासासोबत आपल्याला हिरवे अच्छादन आवश्यक आहे. मुंबई ही फक्त देशाची आर्थिक आणि राज्याची राजकीय राजधानी नाही तर हे मानव आणि निसर्गाच्या सहजीवनाचे शहर आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर भाष्य करताना महापौर तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, शहरांमधील हरित आच्छादन वाढवणे ही जबाबदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांची देखील आहे. हरित आणि निरोगी मुंबई करण्यासाठी मुंबईची प्रथम नागरिक म्हणून मी कटिबद्ध आहे. अरबोरिकल्चर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांच्या आभार व्यक्त करताना या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी विचार मंथन केले. निश्चितपणे विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या मुंबईला या परिषदेच्या मंथनातून नवे विचार आणि मार्ग पुढे येतील. परिषदेचे या सगळ्या शिफारसी आम्ही निश्चितपणे हरित आणि शाश्वत सुगंधित मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंमलात आणू.
'सिटीज, गव्हर्नन्स अँड ट्रीज' या विषयावर फायरसाइड चॅट आयोजित करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या सहाय्यक संपादक रिचा पिंटो यांनी चर्चासत्राचे संचालन केले. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शहरी वृक्षसंवर्धन, प्रशासन आणि शाश्वत नगर नियोजन या विषयांवर मौलिक विचार मांडले. शहरांच्या विकासात वृक्षांना केंद्रस्थानी ठेवणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित झाले.
मुख्यमंत्री फडणवीस आज परिषदेला उपस्थित राहणार
८ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी २ वाजता परिषदेस उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छा दूत व प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मुख्य वक्त्या असणार आहेत. जागतिक तज्ज्ञांच्या सत्रांसह शहरी वृक्षसंवर्धन, अरबोरिकल्चर पद्धती आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.