रिया व शौविक पुरवायचे सुशांतला गांजा,नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे आरोपपत्र सादर

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येसह ड्रग्जचा तपास सीबीआयसह नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरु आहे
 रिया व शौविक पुरवायचे सुशांतला गांजा,नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे आरोपपत्र सादर

सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोने पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात सुशांतला त्याची प्रेयसी रिया चक्रवतीसह इतर आरोपींनी गांजा पुरविल्याचा आरोप केला आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येसह ड्रग्जचा तपास सीबीआयसह नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून सुरु आहे. याच प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत ३५ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले असून त्यात रियासह तिचा भाऊ शौविक आणि इतर आरोपींचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत या आरोपींना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याच चौकशीदरम्यान ड्रग्जची लिंक बॉलीवूडपर्यंत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे काही अभिनेत्यासह अभिनेत्रींची एनसीबीकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. याच प्रकरणी एनसीबीने पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. त्यात मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत गुन्हेगारी कट रचून ड्रग्ज खरेदी करण्यात आले होते. ते ड्रग्ज उच्च सोसायटीसह बॉलीवूडमध्ये वितरीत करण्यात आले होते. या आरोपींनी ड्रग्ज खरेदीसह त्याचे सेवन केले होते असे एनसीबीने आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध २७, २७ अ, २८ आणि २९ कलम लावण्यात आली होती. आरोपपत्रात रियाला दहावी आरोपी दाखविण्यात आले आहे. रियाने तिचा मित्र सॅम्युअल मिरांडा, भाऊ शौविक चक्रवती, सुशांतचा चालक दिपेश सावंतकडून ड्रग्ज घेऊन तो अभिनेता सुशांतसिंग राजपूतला दिले होते. या ड्रग्जचे पैसे शौविकमार्फत दिले जात असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. शौविक हा काही ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता. त्याने अनेकदा सुशांतला ड्रग्ज दिले होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in