
मुंबई : रस्त्यांचा गुणवत्तापूर्ण विकास होत असताना रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षा वाढवणे आणि नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या उद्देशाने अभियंत्यांना विभाग पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. याबाबतची कार्यशाळा नुकतीच पार पडली.
बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या सूचनेनुसार महापालिका, ब्लूमबर्ग फिलांथ्रोपिज इनिशिएटीव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट, ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिटिव्ह (जीडीसीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या निवडक ३३ अभियंत्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यकारी, सहाय्यक, दुय्यम आणि कनिष्ठ अभियंत्यांना अशा सर्व संवर्गातील या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत कार्यरत असणाऱ्या नागरी आणि वाहतूक क्षेत्रातील पंधरा नियोजनकारांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
प्रतिक्रिया
रस्ते, नागरिक, पादचारी तसेच वाहने अशा सर्वच घटकांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि वापरासाठी अनुकूल असावेत, यादृष्टीने पालिका प्रयत्नशील आहे. रस्ते सुरक्षेमध्ये सर्वात महत्वाचा घटक असलेल्या पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी स्वारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, हादेखील यातील उद्देश आहे. जागतिक पातळीवर प्रचलित शहरी गमनशीलता आणि रस्त्त्यांची रचना मुंबईसारख्या शहरात राबवून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी ही कार्यशाळा म्हणजे पहिले पाऊल आहे.
-उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सुविधा)
दिव्यांगांच्या रस्ते सुरक्षेच्या समस्या दूर होणार!
सुरक्षित आणि शाश्वत रस्ते आराखड्यांसह हे रस्ते वापरासाठी सुलभ बनवणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. मुंबईतील रस्ते सुरक्षितता, रस्त्यांचे आराखडे, प्रक्रिया, रस्त्यांसाठी चिन्हांचा आणि दिशादर्शकांचा वापर यासारख्या विषयांचा कार्यशाळेत समावेश होता. त्यासोबतच प्रात्यक्षिक म्हणून वरळी नाका परिसरात ५०० मीटर अंतर प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान रस्ते सुरक्षिततेच्या अनुषंगाने भेडसावणाऱ्या समस्या आणि दिव्यांग नागरिकांसाठीची आव्हाने यासारख्या बाबी समजून घेण्यात आल्या.