पावसाचा तडाखा! रस्ते जलमय, रेल्वे सेवेचा बोजवारा; सहा तासांत ३०० मिमी पाऊस, विमानसेवा विस्कळीत

मुंबईत रविवारी रात्री १ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आणि तो तुफान बरसला. सहा तासांत ३०० मिमी पाऊस कोसळला आणि मुंबईतील बहुतांश भाग पाण्याखाली गेले.
पावसाचा तडाखा! रस्ते जलमय, रेल्वे सेवेचा बोजवारा; सहा तासांत ३०० मिमी पाऊस, विमानसेवा विस्कळीत

मुंबई : बराच काळ उघडीप घेतलेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा जोरदार एंट्री करत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कुडाळ, सिंधुदुर्गला झोडपून काढले. मुंबईत रविवारी रात्री १ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आणि तो तुफान बरसला. सहा तासांत ३०० मिमी पाऊस कोसळला आणि मुंबईतील बहुतांश भाग पाण्याखाली गेले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसच्या मार्गांत बदल करण्यात आले. मध्य व हार्बर मार्गावर भांडुप, नाहूर, कुर्ला, चुनाभट्टी आदी रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प झाली, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. मेल, एक्स्प्रेस गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला. पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईकडे निघालेले आमदार मेल, एक्स्प्रेसमध्ये अडकले होते. कमी दृष्यमानतेमुळे विमानसेवाही विस्कळीत झाली. पावसाच्या तडाख्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्याच्या विविध भागातील नद्यांनी धोक्याची पातळी पार केल्याने शेती व घराघरांमध्ये पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबई, पालघर, रायगडसह कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून मुंबई, पालघर रायगडला 'रेड अलर्ट' तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

केरळात यंदा वेळेआधीच ३१ मे रोजी वरुणराजाचे आगमन झाल्यानंतर मुंबईत दोन दिवस आधीच म्हणजे ९ जून रोजी पावसाची दमदार एंट्री झाली. वेळेआधीच पाऊस दाखल झाल्याने यंदा पाऊस चांगला बरसणार असे वाटत होते. मात्र, ९ जून रोजी बरसलेल्या पावसाने नंतर मुंबईकडे पाठ फिरवली आणि तब्बल महिनाभरानंतर तो रविवारी रात्री पुन्हा जोशात प्रकटला. रविवारी मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर पहाटे चांगलाच वाढला आणि त्याने मुंबईला झोडपून काढले.

पावसाच्या जोरदार तडाख्याने सायन, कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे ठप्प झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईकर अडकून पडले. अनेकांनी पायी प्रवास करीत ऑफिस, तर काहींनी पावसाचा अंदाज घेत मिळेल त्या वाहनाने घर गाठले. सकाळी १० नंतर पावसाने काहीशी उसंत घेतली. त्यामुळे साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. मुंबई महापालिकेची यंत्रणाही पाणी भरणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवून होती. पाणी भरलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. रेल्वे रुळावरील पाणी ओसरल्याने दुपारी १ नंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली. मात्र, लोकल विलंबाने धावत होत्या.

पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. काहीसा थांबलेला पाऊस दुपारनंतर पुन्हा सुरू झाला. अनेकांनी अर्ध्यात अडकून पडू नये म्हणून कार्यालयीन काम घरातून केले. दुपारी १.५७ वाजताच्या दरम्यान समुद्रात ४.४० मीटर उंचीची भरती होती. याचवेळी मुसळधार पाऊस कोसळला असता तर शहरात पाणी भरण्याची शक्यता होती. समुद्राला उधाण आल्याने मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. गेटवे ऑफ इंडिया येथे आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून दूर ठेवले. समुद्राच्या बाजूने दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्राजवळ येण्यापासून थांबवले गेले. तसेच लाऊडस्पीकरवरून सर्व पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भरतीच्या वेळी कमी पाऊस होता, त्यामुळे मोठा धोका टळला. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली होती. पाणी भरणाऱ्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम सज्ज होती. पाणी भरणाऱ्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा करण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. दुपारनंतर रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

'सबवे'त पाणी भरल्याने कोंडी

मुंबईत 'सबवे'मध्ये आणि पाणी तुंबणाऱ्या ठिकाणचे पाणी उपसण्यासाठी पालिकेने ४८० पंप लावल्याचा दावा केला होता. शिवाय 'सबवे' जवळ 'पाणी साठवण' टाक्यांचा प्रयोग करीत पाणी तुंबणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, आजच्या पहिल्याच पावसात अंधेरी, मालाड, दहिसर, सांताक्क्रुझ, मिलन सबवेमध्ये पाणी भरल्याने शासनाचे सर्व दावे फोल ठरले. मालाड 'सबवे'त चारचाकी वाहने अडकली होती. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर क्रेनच्या मदतीने गाड्या बाहेर काढण्यात आल्या.

मदत व पुनर्वसन मंत्रीच अडकले

कोल्हापूरहून रविवारी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तासांनी ही गाडी मजल दरमजल करत छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात पोहोचली. अंबरनाथ येथे अडकलेल्या या गाडीने २०१९ मधील पुराच्या आठवणी जाग्या केल्या. या ट्रेनने येणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेच कुर्ला व दादरच्यादरम्यान अडकल्याचे समोर आले. शिवाय आमदार अमोल मिटकरी यांच्यासह पाच ते सहा आमदार या ट्रेनमध्ये अडकले. अनिल पाटील आणि मिटकरी यांनी थेट ट्रेनमधून उतरून मुंबईच्या दिशेने रेल्वेमार्गावरून वाटचाल केली.

मुंबईत येथे पडला सर्वाधिक पाऊस

 • वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

 • एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

 • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

 • चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

 • आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

 • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

 • नारियलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

 • जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी)

 • महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

 • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

 • नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

 • लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

 • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

 • रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

 • धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

येथे पाणी साचले

दादर टीटी, लालबाग, परळ, भायखळा, वडाळा, चेंबूर, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, घाटकोपर, कुर्ला, कांजूर, मुलुंड, भांडुप, वांद्रे, अंधेरी, पवई, कांदिवली, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, वाशीनाका, फोर्ट, ग्रँट रोड.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईला 'रेड अलर्ट'

हवामानाची स्थिती पाहता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला हवामान खात्याकडून पुढील २४ तासांसाठी दक्ष राहण्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी खबरदारीचा 'रेड अलर्ट' देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग ५०-६० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, पुढचे पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in