मुंबईतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार;सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्ते बांधले जाणार

मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले
 मुंबईतील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार;सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्ते बांधले जाणार

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न नेहमीच मुंबईकरांना सतावतो; मात्र आता पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. यावेळी चहल यांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्तेकामाला वेग आला असून, दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा विश्वास चहल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरणाची रस्तेबांधणी केली जात आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्तेदेखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्चदेखील कमी होतो.

यंदा म्हणजे सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम होत आहे. त्यासाठी दोन हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे, तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे, तर उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण देखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच, पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in