आता मुंबईचे रस्ते चकाचक होणार, 'रोड जेट क्लिनिंग' एकाचवेळी गाळ व पाणी शोषणार

वायू प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली
आता मुंबईचे रस्ते चकाचक होणार, 'रोड जेट क्लिनिंग' एकाचवेळी गाळ व पाणी शोषणार

मुंबई : आता अत्याधुनिक रोड जेट क्लिनिंगद्वारे मुंबईचे रस्ते चकाचक होणार आहेत. रोड जेट क्लिनिंग संयंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी रस्ते स्वच्छता केल्यानंतर गाळ व पाणी शोषून घेण्याची क्षमता त्यात आहे. संपूर्ण स्वच्छ मुंबई मोहिमेंतर्गत अत्याधुनिक रोड जेट क्लिनिंग संयंत्राद्वारे फॅशन स्ट्रिट परिसरात प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांची उपस्थिती होती.

वायू प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अत्याधुनिक संयंत्राचा समावेश करण्यात येत आहे. त्याआधारे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते पाण्याने धुवून काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

रोड जेट क्लिनिंग संयंत्र हे अत्याधुनिक स्वरूपाचे आहे. यामध्ये पाण्याचा उच्च दाब जेटिंग व फिरत्या ब्रशची सुविधा आहे. यामुळे रस्ता दुभाजक स्वच्छ करणे, यांत्रिकी झाडूच्या साहाय्याने रस्त्यांची स्वच्छता करणे, संयंत्राच्या मागील बाजूस असलेल्या उच्च क्षमतेच्या व्हॅक्यूम प्रणालीचा वापर करून एकाचवेळी रस्त्यावरील गाळ आणि पाणी शोषून घेणे आदी प्रकारचे प्रात्यक्षिक यावेळी फॅशन स्ट्रिट येथे दाखविण्यात आले. वाहनाला मागे-पुढे करून स्वच्छतेची यंत्रणा ऑपरेटर सहजपणे नियंत्रित करू शकेल, अशी सुलभ रचना या संयंत्रात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in