रॉबरीच्या उद्देशाने अल्पवयीन मुलाला मारहाण करुन लूट

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना अटक
रॉबरीच्या उद्देशाने अल्पवयीन मुलाला मारहाण करुन लूट

मुंबई : रॉबरीच्या उद्देशाने एका अल्पवयीन मुलाला मारहाण करुन लुटमार करणार्‍या चारजणांच्या एका टोळीला गुन्हा दाखल होताच जुहू पोलिसांनी अटक केली. विनायक मारी देवेंद्र, विनित हरिंदरप्रताप सिंग, दिपेश रोहित कामत आणि रोशनकुमार विनोद महोतो अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सतरा वर्षांचा तक्रारदार मुलगा हा अंधेरीतील जुहू गल्लीत राहत असून कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता तो विलेपार्ले येथील विद्यानिधी मार्ग, कैफी आझमी पार्क परिसरातून जात होता. यावेळी तिथे चारजण आले आणि त्याला धमकी देत पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार देताच त्यांनी त्याला बेदम मारहाण त्याच्याकडील मोबाईल, हेडफोन, साडेतीनशे रुपयांची कॅश घेऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार त्याने त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर ते दोघेही जुहू पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी लुटमार करणार्‍या चारही आरोपींना विलेपार्ले येथून अटक केली. तपासात ते सर्वजण विलेपार्ले येथील नेहरुनगर, राजीव गांधी व समतानगर चाळीतील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in