रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट!

टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे.
रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची लूट!

बऱ्याच प्रतिक्षेनंतर १ ऑक्टोबरपासून मुंबईसह अन्य शहरात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ लागू करण्यात आली. यामध्ये रिक्षाचे भाडे २ रुपयांनी, तर टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली. यासाठी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मीटरमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचन परिवहन विभागाकडून चालकांना करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात तसे न होता बहुतांश ठिकाणी काही रिक्षा, टॅक्सीचालक मीटरमध्ये बदल न करताच, क्यूआर कोड नसलेला भाडेदर तक्ता दाखवून नव्या भाड्याची आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी प्रवासी आणि रिक्षा -टॅक्सी चालक यांच्या वादाच्या तक्रारी परिवहन विभागाला येत आहेत. मात्र याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

मुंबईत रिक्षाचे भाडे २ रुपयांनी, तर टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे रिक्षाचे पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटरसाठी किमान भाडे २१ रुपयांऐवजी २३ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांऐवजी २८ रुपये झाले आहे. कुल कॅबचेही भाडेदर महागले असून सध्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे ३३ रुपयांऐवजी ४० रुपये झाले आहे. परंतु नवीन भाडेदर आकारणीसाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे लागणार आहेत. हे बदल १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान करण्याच्या सूचन करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मीटरमध्ये बदल होईपर्यंत क्यूआर कोड असलेला सुधारित अधिकृत भाडेदर तक्ता वापरण्याच्या सूचना परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सीचालकांना केल्या आहेत. त्यानुसार क्यूआर कोड असलेले भाडेदर तक्ता संघटनांमार्फत चालकांना उपलब्धही केला आहे. मात्र चालक क्यूआर कोड नसलेला भाडेदर तक्ता वापरत असून त्यानुसारच प्रवाशांकडून भाडे वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मीटरमध्ये चीप बसवण्याची प्रक्रिया लांबली

भाडेवाढीनंतर मीटरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मीटरमध्ये एक चीप बसवण्यात येते. परंतु मीटरमधील विविध चाचण्यांमुळे उत्पादकांकडून ही प्रक्रिया काहीशी लांबली आहे. परिणामी, मुंबई महानगरात रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल झालेले नाहीत. त्यामुळे नवीन भाड्याची आकारणीही होऊ शकलेली नाही. मीटर बदलाची ही प्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरू झाल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, याबाबत अजून कोणतीही खात्रीशीर माहिती परिवहन विभागाकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही.

मी आज मुंबई सेंट्रलवरून डॉकयार्ड रोड येथे आली. या दरम्यान मीटरचा नियमित दर ६० ते ६५ रुपये एवढा होतो. त्यानुसार मी पैसे देत असताना भाडेवाढ झाल्याचे सांगत माझ्याकडून ७० रुपयांची मागणी टॅक्सी चालकाने केली. यावेळी अधिकृत भाडेवाढ झाल्याचे काही परिपत्रक अथवा तक्ता दाखव असे विचारले असता उलट उत्तरे चालकांकडून देण्यात आली. वाद टाळावा यासाठी मी त्याच्या मागणीनुसार पैसे दिले. मात्र हि सरळ लूट आहे.

- शुभांगी नेमाडे, प्रवासी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in