

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा दावा अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली असून या चौकशीअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे रोहित पवारांचे जातीने लक्ष आहे. त्यातच, त्यांनी आता या चौकशीबाबत मंगळवारी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. ‘स्व. अजितदादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंग याला सोमवारी पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली असून तो काल देशात आला होता. तसेच ‘व्हीएसआर’कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचाच रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्ड्स उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी ‘व्हीएसआर’ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी ‘सीआयडी’ करत असताना ‘व्हीएसआर’चा मालक भारतात आला असेल तर ‘डीजीसीए’ने ‘सीआयडी’ला कळवणे आवश्यक का समजले नाही?’ असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
यंत्रणांचा एकमेकांशी आहे विसंवाद
‘डीजीसीए’ आणि ‘व्हीएसआर’ची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता त्यांच्या लेखी अजितदादांची किती किंमत आहे, हे कळून चुकले. केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल ही, अपेक्षा आहे’, असेही ते म्हणाले. अजित पवारांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातामागे घातपाताची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. त्यामुळे त्यांनी सातत्याने यावर मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पातळीवर केलेल्या तपासातील काही मुद्दे माध्यमांसमोर मांडले. यातून ब्लॅक बॉक्सची माहिती, अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीच्या मालकाची माहिती, त्यांना असलेले कथित राजकीय वरदहस्त याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजित पवारांना हे विमान द्यायलाच नको होते...
अपघातग्रस्त विमानाची ५ हजार तास उडण्याची क्षमता होती. ज्यावेळी अजित पवारांना हे विमान सेवेसाठी दिले तेव्हा फक्त १० ते १५ तासच शिल्लक होते. त्यामुळे असे विमान अजित पवारांना द्यायलाच नको होते, असे रोहित पवार म्हणाले. तसेच हे विमान ८ हजार तासांहून अधिक काळ उडाले असण्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली. त्यातच, आता त्याचा रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.