DGCA विरोधात गुन्हा नोंदविण्यास पोलिसांचा नकार; मरीन लाईन्स ठाण्यात रोहित पवार आक्रमक; पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी ‘डीजीसीए’ विरोधात तक्रार करण्याची मागणी केली आणि बुधवारी सकाळी ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात वाद पेटला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
DGCA विरोधात गुन्हा नोंदविण्यास पोलिसांचा नकार; मरीन लाईन्स ठाण्यात रोहित पवार आक्रमक
DGCA विरोधात गुन्हा नोंदविण्यास पोलिसांचा नकार; मरीन लाईन्स ठाण्यात रोहित पवार आक्रमकPhoto : X (RRPSpeaks)
Published on

मुंबई : बारामतीत अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात, याविषयी आमदार रोहित पवार हे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी डीजीसीए , सीआयडी, विमान वाहतूक मंत्री यांच्या भूमिकांवर पत्रकार परिषदेत वारंवार संशय व्यक्त केला आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाप्रकरणी रोहित पवार यांनी ‘डीजीसीए’ विरोधात तक्रार करण्याची मागणी केली आणि बुधवारी सकाळी ते थेट मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यात वाद पेटला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये काय घडले याची माहिती पत्रकारांना देताना रोहित पवार यांनी ‘डीजीसीए’ विरोधात एफआयआर बुधवारीच करण्याचा निर्णय का घेतला याची माहिती दिली. डीजीसीएने एक परिपत्रक काढले. व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी ५ विमाने थांबवण्याचा आदेश दिल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे व्हीएसआर कंपनी विमान अपघाताला कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्ष समोर आले. त्याआधारे आम्ही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. नवीन फौजदारी कायद्याच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यावेळी अधिकार्‍यांशी वाद झाला.

गुन्हा नोंदवणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा...

एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझे स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली, तेव्हाच एका मोठा अधिकारी तिथे आला. डीसीपी तिथे आले, ते म्हणाले, आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा. आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

अजितदादांना न्याय नाही तर सामान्यांचे काय?

अजितदादांचा मृत्यू झाला. घात की अपघात याविषयी आम्ही शंका व्यक्त करत आहोत. मग अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा नियम का, असा सवाल त्यांनी केला. एफआयआर करण्यापासून आम्हाला का रोखले जात आहे, असा सवाल रोहित पवारांनी केला.

बारामतीत जाऊन गुन्हा नोंदवण्याचे प्रयत्न करू

मरीन ड्राईव्ह पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत, आता बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करू, असेही रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उद्या सकाळी १० वाजता बारामती पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे पवार म्हणाले.

रोहित यांची तक्रार स्वीकारली

दरम्यान, रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा केला असतानाच याविषयावर पोलिसांची बाजू समोर आली आहे. रोहित पवार यांनी दिलेली तक्रार आम्ही स्वीकारली असून ती तपासून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करू, असे मुंबई पोलिसांनी कळवल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in