अजितदादांच्या पावलांवर रोहित पवारांचे पाऊल; आता दर मंगळवारी 'जनता दरबारा'चा वारसा कायम ठेवणार

अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे रोहित पवारांनी ठरविले आहे. अजित पवारांप्रमाणे आता रोहित पवारही दर मंगळवारी ‘जनता दरबार’ भरवणार आहेत. त्या माध्यमातून लोकांच्या समस्या तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या अडचणीही ते जाणून घेणार आहेत.
अजितदादांच्या पावलांवर रोहित पवारांचे पाऊल; आता  दर मंगळवारी 'जनता दरबारा'चा वारसा कायम ठेवणार
अजितदादांच्या पावलांवर रोहित पवारांचे पाऊल; आता दर मंगळवारी 'जनता दरबारा'चा वारसा कायम ठेवणार
Published on

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी जागवताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे विधानसभेत भावूक झाल्याचे सर्वांनीच पाहिले. त्यानंतर आता काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे रोहित पवारांनी ठरविले आहे. अजित पवारांप्रमाणे आता रोहित पवारही दर मंगळवारी ‘जनता दरबार’ भरवणार आहेत. त्या माध्यमातून लोकांच्या समस्या तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या अडचणीही ते जाणून घेणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसे पत्रकच जाहीर करण्यात आले आहे.

रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस असून ते बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार आहेत. अधिवेशनाच्या काळानंतर रोहित पवार हे दर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रदेश कार्यालयात ‘जनता दरबार’ भरवणार आहेत. या दरम्यान ते लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

अजितदादांवर बोलताना रोहित पवार भावूक

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात अजित पवारांना आदरांजली वाहिली गेली. त्यावेळी रोहित पवार हे भावूक झाल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या आठवणी जागवताना रोहित पवारांनी त्यांच्या अपघातावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही दिवसांमध्ये चार पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात तपास योग्य दिशेने व्हावा अशी मागणी करत रोहित पवारांनी थेट केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा मागितला.

जनता दरबाराचा पुढे चालू ठेवणार...

अजित पवारांच्या कामाची शैली सगळ्या महाराष्ट्राला माहिती होती. अजित पवार हे भल्या पहाटे कामाला सुरूवात करायचे. शरद पवारांकडून अजित पवारांनी तो वारसा घेतला. अजित पवार हे दर मंगळवारी जनता दरबार भरवायचे आणि लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. या दरम्यान त्यांना भेटायला आलेल्या सर्वसामान्य लोकांची कामे ते करायचे. जे काम नियमात बसायचे ते काम अजित पवार शंभर टक्के करायचे अशी प्रतिमा त्यांची होती. आता अजित पवारांनंतर त्यांचा हा वारसा रोहित पवार पुढे चालवणार असल्याचे चित्र आहे. रोहित पवार हे दर मंगळवारी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in