रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;चर्चांना आले उधाण

भाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत
रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला;चर्चांना आले उधाण

एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकेची झोड उठवली असतानाच दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होते. या भेटीत त्यांनी दोघांशी १० ते १५ मिनिटे चर्चा केली. भाजपचे मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘विधानसभेत महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबेची तलवार आहे, अशा अनेक वस्तू बाहेर आहेत. त्या भारतात कशा आणाव्यात, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसेच पोलिसांच्या सुट्टीबद्दलही आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

मोहित कंबोज यांचा रोहित पवारांना इशारा

भाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी अलीकडेच एक ट्विट करत रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in