

पूनम अपराज /मुंबई
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना एस्प्लानेड न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून आरोपींचे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे तसेच माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांशी त्यांचे संबंध असल्याचा संशय आहे.
पोलिसांनी पाचवा आरोपी आसाराम फसाले (४२) याला आज पुण्यातून अटक केली. आरोपी स्वप्नील सकट यांच्या घरातून पिस्तूल, तीन मॅगझिन/काडतुसे, एअरगन जप्त केली. ही शस्त्रे फसाले याने पुरवली होती. फसाले हा फरार आरोपी शुभम लोणकर याच्या संपर्कात होता. लोणकर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य फरारी आरोपींपैकी एक आहे.
‘सिग्नल’ मेसेजिंग ॲॅपचा वापर
पुण्यातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कारवायांमुळे आरोपी प्रभावित झाले होते आणि त्यातूनच त्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे. आरोपी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ‘सिग्नल’ या मेसेजिंग ॲॅपचा वापर करत होते. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही आरोपींनी सिग्नल ॲप डिलिट केले.