रोटरी क्लब, मराठा सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ तर्फे पेणमध्ये आनंद मेळावा

ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन, ७ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांची मेजवानी
रोटरी क्लब, मराठा सामाजिक सांस्कृतिक विकास मंडळ तर्फे पेणमध्ये आनंद मेळावा

रोटरी क्लब ऑफ पेण व मराठा सामाजिक, सांस्कृतिक विकास मंडळ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आनंद मेळावा ७ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन शिगवण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मेळाव्याचे उद्घाटन पेणचे आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिप सभापती नीलिमा पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात शिवकालीन हत्यार प्रदर्शन हे खास आकर्षण असणार आहे. या बरोबरच विविध भारतीय लोकनृत्य, राष्ट्रीय खेळाडू असलेले कबड्डी सामने, मिस कोकण सुंदरी, शरीर सौष्ठव स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा, अंतर शालेय नृत्य स्पर्धा, असे विविध कलाविष्कर यांनी संपन्न हा मेळावा असणार असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन शिगवण यांनी सांगितले. शिवकालीन हत्यार प्रदर्शन हे शालेय मुलांना इतिहास व शौर्य आताच्या मुलांना समजावं हा उद्देश आहे. पेण नगरपालिका व गतिमंद शाळांच्या विद्यार्थी यांच्या साठी मोफत असून इतर शाळांच्या मुलांना नाम मात्र दहा रुपये प्रवेश फी असणार असल्याची माहिती युवा नेते मंगेश दळवी यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी पेण तालुक्यातील सर्व शाळांच्या विदयार्थ्यांसह तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी होणार असल्याचे हरीश बेकावडे यांनी सांगितले. या मेळाव्यातील सांस्कृतिक कार्यक्रमास सहभागी होणाऱ्या शाळांच्या मुलांना रोटरी क्लब संस्थे तर्फे प्रोत्साहन पर १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. रोटरी क्लब मार्फत मागील २९ वर्षे या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे रोटरायन मितेश शहा यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन शिगवण, मराठा सामाजिक, सांस्कृतिक विकास मंडळाचे सदस्य मंगेश दळवी, समाजसेवक हरीश बेकावडे, नितीन चव्हाण, रोटरी क्लबचे मितेश शहा, रोहन मनोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in