बुलेट ट्रेनचे भूसंपादन महिनाभरात मार्गी लावा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय आणि वनजमिनीचे हस्तांतर या बाबींना गती देण्याची सूचनाही त्यांनी केली
बुलेट ट्रेनचे भूसंपादन महिनाभरात मार्गी लावा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले अडीच वर्ष रखडलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती देण्याचा निर्णय घेतला आहे. बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतर हे विषय येत्या महिनाभरात म्हणजे ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला नीती आयोगाने मान्यता दिली असून, केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. या प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय आणि वनजमिनीचे हस्तांतर या बाबींना गती देण्याची सूचनाही त्यांनी केली.

राज्यातील रेल्वे, मेट्रो, मल्टिमोडल कॉरिडोर, तुळजापूर-पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी कामे करावीत, तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानगी या तातडीने मिळवून घ्याव्यात. प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो, त्याचप्रमाणे लोकांना सुविधादेखील मिळण्यास उशीर होतो. केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून, राज्यानेदेखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत, यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८.१७ कि.मी. लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प असून यासाठी एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण १२ स्थानके असून, महाराष्ट्रात त्यातील चार स्थानके आहेत. यासाठी एमएमआरडीएमधील ४.८ हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. सोमवारच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-३, ४, ५, ६, ९ आणि ११ तसेच मेट्रो मार्ग २ ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-४ तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-५ या मार्गांसाठी भूसंपादन तसेच हस्तांतराचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी सूचना शिंदे यांनी दिली.

या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मध्य रेल्वे, हाय स्पीड रेल कार्पोरेशनचे अधिकारी तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीचे सादरीकरण वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in