कुर्ला स्थानकात आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण

आरपीएफ जवान मुकेश यादव याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे
कुर्ला स्थानकात आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण

मुंबई : मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात ७ आणि ८ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ होऊन तो जागेवरच कोसळला. त्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) जवानाने तत्काळ त्या व्यक्तीला सीपीआर दिला. त्यानंतर श्वसनक्रिया सुरू झाल्यावर त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरपीएफ जवान मुकेश यादव याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चेंबूरमधील घाटला येथे राहणारा निलेश केमाळे (वय ४५) हा तरुण रेल्वेने जात असताना छातीत कळ आल्यामुळे कुर्ला स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरच कोसळला. कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता कॉन्स्टेबल मुकेश यादव यांनी मानवतेच्या भावनेतून त्याला सीपीआर दिला. वेळीच प्राथमिक उपचार झाल्यामुळे निलेश याला पुन्हा श्वास घेता येऊ लागला. त्यानंतर आरपीएफ आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) अथक प्रयत्नानंतर केमाळे याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुकेश यादव यांनी सीपीआर दिल्याच्या कृतीमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचण्यास मदत झाली.

रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, “आरपीएफ जवानाने सीपीआर दिल्यामुळेच प्रवाशाचा जीव वाचल्याचे भाभा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे. मात्र वेळीच उपचार करणाऱ्या कॉन्स्टेबल मुकेश यादव यांचे कौतुक केले जात आहे.” दरम्यान, मध्य रेल्वेकडून आरपीएफ जवान मुकेश यादव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुकेश यादव यांनी कर्तव्य बजावत असताना दाखवलेल्या सतर्कतेमुळेच एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. मुकेश यादव यांच्यावर रेल्वे विभागाकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in