पाच मुजोर टॅक्सीचालकांना आरटीओद्वारे ‘कारणे दाखवा’ नोटीस

पाच मुजोर टॅक्सीचालकांना आरटीओद्वारे ‘कारणे दाखवा’ नोटीस

प्रवास करताना काळ्या-पिवळ्या आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सींच्या चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी

अनेक वेळेस सूचना देऊनही मुंबईसह अन्य शहरात टॅक्सीचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. याच मुजोरपणाला आळा घालण्यासाठी ताडदेव आरटीओद्वारे प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. या हेल्पलाइनवर प्रतिदिन प्रवाशांच्या तक्रारी येत मागील आठवडाभरात १५ प्रवाशांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत १५ पैकी पाच टॅक्सीचालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याची माहिती ताडदेव आरटीओकडून देण्यात आली आहे.

प्रवास करताना काळ्या-पिवळ्या आणि मोबाइल ॲपआधारित टॅक्सींच्या चालकांविरोधात प्रवाशांना तक्रार करता यावी, यासाठी ताडदेव आरटीओने अलीकडे ९०७६२०१०१० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर केलेल्या तक्रारींची त्वरित दखल घेण्यात येत असून दोषी चालकाचा वाहन परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत हेल्पलाइन क्रमांकावर १५ प्रवाशांनी तक्रार केली आहे. यापैकी १० तक्रारींचे तत्काळ घटनास्थळीच निवारण करण्यात आले. तर पाच प्रकरणांमध्ये चालकांवर ताडदेव आरटीओद्वारे ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष पथक

प्रवाशांच्या मदतीसाठी ताडदेव आरटीओने तीन अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमले आहे. त्या पथकाला एक वाहन, मोबाइल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा आदी उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना रात्री-अपरात्री टॅक्सीचालकांशी संबंधित समस्या भेडसावल्यास त्याबाबत mh01taxicomplaint@gmail.com या ई-मेलवरही पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधी फोन करून किंवा व्हॉट्सॲप, मोबाइलवरून थेट संदेश पाठवून तक्रार करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in