खराब टायरपासून बनवले हरित काँक्रीट रुबक्रेट; ‘आयआयटी-बॉम्बे’च्या शोधकांची कमाल

देशात कोट्यवधी गाड्या सतत धावत असतात. या गाड्यांचे टायर झीजल्याने खराब झाल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जातात. या टाकाऊ टायरपासून ‘हरित काँक्रीट’चे उत्पादन करण्याची कमाल ‘आयआयटी-बॉम्बे’च्या संशोधकांनी केली आहे.
खराब टायरपासून बनवले हरित काँक्रीट रुबक्रेट; ‘आयआयटी-बॉम्बे’च्या शोधकांची कमाल
Published on

विक्रांत झा/मुंबई

देशात कोट्यवधी गाड्या सतत धावत असतात. या गाड्यांचे टायर झीजल्याने खराब झाल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जातात. या टाकाऊ टायरपासून ‘हरित काँक्रीट’चे उत्पादन करण्याची कमाल ‘आयआयटी-बॉम्बे’च्या संशोधकांनी केली आहे. या काँक्रीटचे नामकरण ‘रुबक्रेट’ असे केले आहे. हे काँक्रीट अधिक मजबूत असून पर्यावरणस्नेही आहे. या संशोधनामुळे भारतातील टाकाऊ रबरची समस्या दूर होणार आहे. तसेच पर्यावरणपूरक काँक्रीट वापरायला मिळणार आहे.

भारतात दरवर्षी २.५ दशलक्ष मेट्रिक टन टायरचे उत्पादन होते. तर ०.८ दशलक्ष मेट्रिक टन टायर भंगारात जातात. रबराच्या टायरची विल्हेवाट कशी लावावी ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘आयआयटी, बॉम्बे’च्या संशोधकांनी या समस्येवर मोठा तोडगा काढला आहे. वाळू आणि रेतीसारख्या नैसर्गिक घटकांच्या एका भागाची जागा घेऊन, रबराचे कण काँक्रीटमध्ये टाकल्यास ते अधिक मजूबत बनतात.

‘आयआयटी, बॉम्बे’चे पीएचडी स्कॉलर पृथ्ववेंद्र सिंग म्हणाले की, रबर व सिमेंटमधील सूक्ष्म संबंध समजावून घेणे हे आमच्या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट होते. रबरामुळे काँक्रीटला अधिक मजबुती मिळते. रबराचे अतिसूक्ष्म कण व सिमेंट यांच्या जोडीमुळे ते अधिक भक्कम बनते, अस सिंग यांनी सांगितले. आमच्या संशोधनात आढळले की, रबरामध्ये पाणी शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता आहे. सिमेंट व रबर एकत्रित आल्यास हीच प्रक्रिया होते. विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर रबर व सिमेंट भक्कम बनते. पारंपरिक काँक्रीटपेक्षा ते अधिक मजबूत बनते, असे सिंग म्हणाले.

एक्स-रे डिफ्रॅक्शन, फूरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आणि स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आदी प्रगत तंत्रांचा वापर करून, संशोधकांनी ‘रुबक्रेट’चे रासायनिक आणि संरचनात्मक गुणधर्म मांडले. त्यांच्या विश्लेषणातून आढळले की, रुबक्रेटमधील गुणधर्म अधिक चांगल्या प्रकारे ओलावा शोषून घेतात.

या काँक्रीटच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांपासून वास्तवात उपयोग करण्याची योजना आखली जात आहे. ज्यात रुबक्रेटवर मीठ फवारणी, दीर्घकालीन सागरी वातावरणात वापरणे आदींचा समावेश आहे.

असा होईल ‘रुबक्रेट’चा वापर

‘रुबक्रेट’मध्ये लवचिकता असते. त्यामुळे काँक्रीट म्हणून ते भेगा प्रतिबंधक, सागरी कामासाठी, रेल्वे बफर्स व भूकंपविरोधी घरे बांधण्यासाठी वापरले जाऊ शकते. ‘रुबक्रेट’ची ताकद त्याच्या ओलसरपणा आणि लवचिकतेत आहे. पर्यावरणीय ताणांना - औष्णिक आणि रासायनिक दोन्ही प्रकारच्या प्रतिकारशक्तीत आहे, असे सिंग म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in