१०वी, १२ वीच्या परीक्षा काळात लोकल वेळेवर चालवा; प्रवासी महासंघाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

बुधवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून यानंतर दहावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होणार...
१०वी, १२ वीच्या परीक्षा काळात लोकल वेळेवर चालवा; प्रवासी महासंघाची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
(संग्रहित छायाचित्र)
Published on

बदलापूर: बुधवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून यानंतर दहावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही परीक्षा सुरू होणार आहेत. सुमारे महिना-दीड महिना सुरू राहणाऱ्या परीक्षाकाळात लोकल वेळेवर चालवाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

दहावी - बारावीसारख्या शालेय - महाविद्यालयीन परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. त्यासाठी विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतात. मात्र एवढं करूनही काही कारणास्तव वेळेवर पेपरला पोहचता आले नाही, तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असते. कल्याणपासून पुढे मुंबईपर्यंच्या पट्ट्यात लोकल सेवा विस्कळित झाली तरी अन्य परिवहन सेवा सक्षम आहेत. परंतु कल्याण कर्जत व कल्याण - कसारा मार्गावरच्या ग्रामीण भागात अशा सुविधा नसल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळित झाल्यास वा विलंबाने धावल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. मागील वर्षीही विद्यार्थ्यांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अनेक पालकांनी तसेच शिक्षकांनी लोकल वेळेवर सुरू रहाव्यात, यासाठी प्रयत्न व्हावेत,अशी मागणी प्रवासी महासंघाकडे केली आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी परीक्षा काळात रेल्वे लोकल वेळेवर चालवाव्यात, अशी मागणी केली आहे.

रेल्वे प्रशासनाकडून आश्वासन

मेल, एक्स्प्रेस पुढे काढण्याच्या प्रयत्नात अनेकदा कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल उशिरा धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कर्जत, कसारा रेल्वे मार्गावर पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने दहावी-बारावी परीक्षांच्या काळात असे प्रकार झाल्यास विद्यार्थ्यांची किती गैरसोय होऊ शकते, याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय परिचालन व्यवस्थापक रामचंद्रन यांच्याशी मनोहर शेलार यांनी फोनद्वारे चर्चा केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत लोकल गाड्या वेळापत्रकानुसार धावतील, असा प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन रामचंद्रन यांनी दिल्याचे शेलार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in