
येत्या दिवसांमध्ये उर्फी जावेदवरून सुरु झालेला वाद चांगलाच तापणार आहे. (Urfi Javed Controversy) कारण, उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेषभूषेवरून आता राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) विरुद्ध महिला आयोग असा सामना पाहायला मिळत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, उर्फी जावेदवर टीका करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर ताशेरे ओढले होते. यावरून आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत त्यांनी खोटी माहिती दिली असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या होत्या की, उर्फी जावेद प्रकरणावर महिला आयोग गप्प का आहे? अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला महिला आयोगाने नोटीस पाठवली होती. मात्र, आता उर्फी जावेदला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेत म्हणाल्या की, " चित्रा वाघ यांनी माध्यमांना खोटी माहिती पुरवली आहे. अनुराधा बेवसिरीजच्या पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने तेजस्विनी पंडीतला कोणतीही नोटीस पाठवली नव्हती. यासंदर्भात आम्ही 'अनुराधा' वेबसिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. ही नोटीस आम्हाला मिळालेल्या तक्रारीवरून पाठवण्यात आली होती. दिग्दर्शक म्हणून तुमची भूमिका स्पष्ट करा, असे या नोटीसमध्ये होते. त्यानंतर दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तरही दिले होते. यामध्ये कुठेही अभिनेत्री तेजस्विनी पंडिताचा उल्लेख नव्हता." असे स्पष्टीकरण दिले आहे. एवढचं नव्हे तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस पाठवले आहे, असेदेखील सांगितले. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.