आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी रुपया त्याच्या नवीन नीचांकी पातळीवर गेला. बाजाराच्या सुरुवातीला भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत ३७ पैशांनी गडगडून ८१.९० या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाले. विदेशी बाजारात डॉलर मजबूत होत आहे. गुंतवणूकदारांना धोका पत्करायचा नाही. तसेच देशांतर्गत बाजारात नकारात्मक वातावरणामुळे बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. गेल्या २० वर्षातील हा नीचांकी दर असल्याचे सुगंधा सचदेव, व्हाईस प्रेसिडेंट, कमोडिटी ॲण्ड करन्सी रिसर्च, रेलिगेअर ब्रोकिंग लि. यांनी सांगितले.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये बुधवारी स्थानिक चलन ८१.९०वर उघडले आणि दिवसभरातील व्यवहारानंतर ते ८१.९० या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाले. मंगळवारच्या बंदच्या तुलनेत रुपया ३७ पैशांनी गडगडला. मंगळवारी रुपया १४ पैशांनी मजबूत होऊन ८१.५३वर बंद झाला होता.