४६ पैशांनी रुपया घसरला,सेन्सेक्स आणि निफ्टीत किंचित वाढ

चौथ्या दिवशी ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस १६.१७ अंक किंवा ०.०३ टक्का वाढून ५३,११७.४५ वर बंद झाला
४६ पैशांनी रुपया घसरला,सेन्सेक्स आणि निफ्टीत किंचित वाढ

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण असतानाही तेल आणि वायू, आयटी आणि वाहन कंपन्यांची समभागांची खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सकाळच्या घसरणीनंतर दिवसअखेरीस किंचित वधारुन बंद झाले.

सलग चौथ्या दिवशी ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस १६.१७ अंक किंवा ०.०३ टक्का वाढून ५३,११७.४५ वर बंद झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून विक्रीचा मारा आणि जागतिक बाजारातील नकारात्मक व्यवहारामुळे मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजारत ३९० अंकांनी घसरुन उघडला आणि ५२,७७१.५३ ही किमान पातळी गाठली होती. ही घसरण ४०५ अंकांपर्यंत वाढली होती. तथापि, आशियाई बाजारात उशिराने झालेली वाढ आणि युरोपियन बाजारात झालेली वधारणा यामुळे घसरलेला बाजार सावरण्यास मदत झाली आणि दिवसअखेरीस किंचित वधारुन बंद झाला.

अशाच प्रकारे राष्ट्रीय बाजारात निफ्टी १८.१५ अंक किंवा ०.११ टक्का वधारुन १५,८५०.२० वर बंद झाला. दिवसभरात तो १५,७१०.१५ ही किमान आणि १५,८९२.१० ही कमाल पातळी गाठली होती. बीएसईतील ३२ कंपन्यांच्या समभागात वाढ तर १७ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा २.७८ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.४९ टक्के, डॉ. रेड्डीज १.४१ टक्के, टाटा स्टील १.३४ टक्के आणि टेक महिंद्राचा समभाग १.२६ टक्के वधारला. तसेच लार्सन ॲण्ड टुब्रो, इन्फोसिस, आयटीसी, ॲक्सिस बँक, एसबीआय आणि एचसीएल टेक यांच्या समभागातही वाढ झाली. तर टायटनचा समभाग ३.५४ टक्के, एशियन पेंटस‌् ३.२५ टक्के, बजाज फिनसर्व १.९४ टक्के आणि कोटक बँक १.३२ टक्के घसरण झाली. आयसीसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इंडस‌‌्इंड बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागातही घट झाली.

आशियाई बाजारात टोकियो, शांघाय, सेऊल बाजारात प्रारंभी घसरण झाल्यानंतर दिवसअखेरीस वाढ झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. तर अमेरिकन बाजारात सोमवारी घसरण झाली होती.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.५८ टक्के वाढून प्रति बॅरलचा भाव ११६.९ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय शेअर बाजारात १२७८.४२ कोटींच्या समभागांची विक्री केली.

logo
marathi.freepressjournal.in