सचिन वाझेला ईडीचा झटका; माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते
सचिन वाझेला ईडीचा झटका; माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे

निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या अडचणीत वाढ होणार आहे. याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सचिन वाझेला माफीचा साक्षिदार म्हणून दिलेली परवानगी ईडीने मागे घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते. आता ईडीकडून ही परवानगी मागे घेण्यात आली आहे. सचिन वाझे हा सीबीआयच्या गुन्ह्यात देखील माफीचा साक्षीदार आहे. ईडीच्या गुन्ह्यात मात्र तो आता माफीचा साक्षीदार राहणार नाही. ईडीकडून आता त्याला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता नसणार आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना याबाबत पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सचिन वाझेने देखील परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर पत्राद्वारे केलेल्या आरोपांची री ओढली होती. तसेच परबीर सिंह सांगतात त्या प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याची कबुली दिली होती. तसेच आपल्याला सेवेत परत घेण्यासाठी लाच मागितली असल्याचा आरोप देखील वाझेने केला होता. या प्रकरणात ईडीकडून वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आपण कोर्टात खरे सांगू या अटीवर वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते.

परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना मुंबईतील मोठे बार, रेस्टॉरंट आणि पबच्या मालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पत्र लिहून याबाबतचा आरोप केला होता. सचिन वाझे हा खंडणी वसुलीचे काम करायचा. तसेच पोलिसांच्या बदल्यामध्ये देखील घोटाळा केला जायचा, असे गंभीर आरोप देशमुख यांच्यावर करण्यात आले होते.

अनिल देशमुख यांना या प्रकरणात 11 महिने तुरुंगवास बोगावा लागला होता. या काळात सचिन वाझेविरोधात कोर्टात जोरदार युक्तीवाद केला होता. वाझेविरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. ठाण्याच हिरे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या प्रकरणाचा देखील यात समावेश आहे. तसेच हे प्रकरण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याशी निगडीत असल्याची देखील चर्चा आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांचा तपास सुरु आहे. त्यामुळे सचिन वाझेवर काय कारवाई केली जाते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in