सचिन तेंडुलकरही ‘डीपफेक’चा शिकार

काही महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सेलिब्रेटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात येत होते.
सचिन तेंडुलकरही ‘डीपफेक’चा शिकार

मुंबई : भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज सचिन तेंडुलकरही डीपफेकचा शिकार झाला आहे. मुलगी सारा आणि खुद्द सचिनचाच डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याने याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

सचिन आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सचिनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून हा खोटा आणि डीपफेक असल्याचे म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सेलिब्रेटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात येत होते. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराने जोर धरला आहे. अभिनेत्रीपासून सुरू झालेला हा प्रकार आता क्रिकेटच्या देवापर्यंत पोहोचला आहे. आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन एका अॅपचे प्रमोशन करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरच्या आवाजाची डबिंग करून एआयच्या सहाय्याने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकरला आपला डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाल्यावर त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, हा व्हिडीओ फेक आहे. काही लोक तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. मी प्रत्येकाला विनंती करतो की, हा व्हिडीओ सर्वांनी रिपोर्ट करावा. याशिवाय ज्या ॲपसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला, ते ॲप देखील रिपोर्ट करावे.

सारा तेंडुलकरलाही फटका

काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरही डीपफेकची शिकार झाली होती. तिचा आणि भारताचा फलंदाज शुभमन गिल यांचा एक फोटो डीपफेकच्या सहाय्याने बनवला होता. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकत्र दिसत होते.

नियम अधिक कडक करणार -केंद्रीय मंत्री

डीपफेक जगासाठी मोठे आव्हान बनले आहे. याबाबत अधिक कायदा कडक केला जाईल, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. सचिन तेंडुलकर यांनी जारी केलेल्या व्हिडीओवर त्यांनी चिंता व्यक्त केली. एआयद्वारे तयार केलेला डीपफेक व चुकीच्या सूचना या भारतीय युजर्सच्या सुरक्षा व विश्वासासाठी धोका आहे. त्यामुळे नुकसान होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in