मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेले बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने सीबीआय आणि तळोजा तुरुंग प्रशासनाला नोटीस बजावत याचिकेची सुनावणी नियमित न्यायालयालासमोर १४ जूनला निश्चित केली.
१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. तर अन्य आरोपी जामीनावर बाहेर असून मला तुरूंगात का ठेवण्यात आले आहे? आता तरी मला जामीन द्या, अशी विनंती करत अॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत त्यांनी जामीनासाठी याचिका केली आहे. सुनावणीवेळी वाझे याच्या वतीने अॅड. आबाद पोंडा यांनी बाजू मांडताना, “वाझे मार्च २०२१ पासून तुरुंगात आहे. खंडणी वसुलीप्रकरणी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. असे असताना माफीचा साक्षीदार बनविण्यात आलेल्या वाझेला तुरुंगात का ठेवण्यात आले आहे?” असा प्रश्न उपस्थित केला.