मला सीबीआयने तुरुंगात बेकायदा डांबून ठेवलंय, सुटकेचा आदेश द्यावा : सचिन वाझेची हायकोर्टात धाव
मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मला सीबीआयने माफीचा साक्षीदार बनवण्यास संमती दिली आहे. त्यानंतर कोठडीच्या मुदतवाढीसंबंधी कुठलाही आदेश दिलेला नसताना मला तुरुंगात डांबून ठेवले आहे, असा आरोप करून न्यायालयाने माझ्या सुटकेचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका वाझेने केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
व्यापारी मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणात वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मार्च २०२१ मध्ये अटक केली. तेव्हापासून वाझे तळोजा तुरुंगात आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांची जामिनावर सुटका झाली. तसेच सीबीआयने वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्यास संमती दिली आहे. याकडे लक्ष वेधत वाझेने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष सीबीआय न्यायालयाने ५ एप्रिल २०२३ रोजी त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवण्यासंबंधी वैध आदेश नसताना मला तुरुंगात डांबले आहे, असा दावा वाझेने तळोजा तुरुंगातून स्वहस्ताक्षराने लिहिलेली याचिका ॲड. आरती कालेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.