सचिन वाझेला हायकोर्टाचा झटका; तुरुंगाबाहेर पडण्यासाठी केलेली याचिका फेटाळली

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्याचा कट व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला गुरुवारी उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला.
सचिन वाझेला हायकोर्टाचा झटका; तुरुंगाबाहेर पडण्यासाठी केलेली याचिका फेटाळली
Published on

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्याचा कट व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला गुरुवारी उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला.

या प्रकरणात अटक करण्यापूर्वी राज्य सरकारकडून आवश्यक मंजुरी घेण्यात आली नव्हती, असा दावा करीत वाझेने तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी वाझेने दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळली.

पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा करीत वाझेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अटकेची कारवाई बेकायदेशीर असल्यामुळे तातडीने तुरुंगातून सोडून देण्यात यावे, अशी विनंती केली होती. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होतो. त्यामुळे पोलिसांनी माझ्या अटकेपूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी घेणे गरजेचे होते, असा दावा वाझे याने याचिकेत केला होता.

या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठवेलेला निर्णय गुरुवारी जाहीर केला. वाझेने मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट आणि ठाणे येथील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्या प्रकरणात घेतला होता. अशा स्थितीत वाझे हा पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कर्तव्य बजावत होता, असे म्हटले जाऊ शकत नाही. त्यामुळे वाझेला अटक करण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राज्य सरकारकडून कारवाईसाठी मंजुरी घेण्याची आवश्यकताच नसल्याचे स्पष्ट करत वाझेची याचिका फेटाळून लावली.

नेमके प्रकरण

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटीलिया बंगल्याबाहेर स्फोटके भरून ठेवलेली कार पार्क करण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2021 रोजी संबंधित कार बेवारस स्थितीत आढळली होती. त्यानंतर काही दिवसांनी 5 मार्च 2021 रोजी कार ज्याच्या नावावर होती, तो ठाण्यातील व्यवसाय मनसुख हिरेन याचा मृतदेह खाडीकिनारी आढळून आला होता. या दोन्ही प्रकरणांत वाझेचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सध्या वाझे नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

logo
marathi.freepressjournal.in