
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर आता वाझेकडून याचप्रकरणी नियमित जामिनासाठी तर याच प्रकारातील अटक आरोपी संजीव पलांडे यांची आरोपपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेत विशेष सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहे. या अर्जांची दखल घेत विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाड यांनी दखल घेत सीबीआयला भूमिका सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २० जूनला निश्िचत केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे या प्रकरणातील कनेक्शन समोर आले. त्यानंतर वाझेने देशमुखांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवत ईडीला पत्रही पाठवले होते. खंडणीप्रकरणात ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकार्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार असून सीआरपीसीच्या कलम ३०६, ३०७नुसार माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची विनंती वाझेने पत्रातून केली होती.
याचप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज वाझेकडून सत्र न्यायालयात करण्यात आला होता. तो अर्ज स्वीकारण्यात आला. माफीच्या साक्षीदारासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाझे याला सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी वाझे याने अधिकृतरीत्या माफीचा साक्षीदार होण्याच्या संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्यावेळी साक्षीदार होण्यासाठीच्या अटी व शर्तींची माहितीही वाझेला देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी सचिन वाझेकडून नियमित जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश सुनावणी २० जून रोजी निश्चित केली.