मुंबई : १०० कोटींची खंडणी वसुली, मनसुख हिरेन हत्या आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणी कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने पुन्हा झटका दिला. विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधी ए.एम.पाटील यांनी वाझे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच खटल्याची ३० सप्टेंबरपासून नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित करून, सचिन वाझेसह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश जारी केले.
सचिन वाझेला एनआयएने मार्च २०२१ मध्ये व्यापारी मनसुख हिरेन हत्या व अँटिलिया स्फोटके प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून तो नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात कैद आहे. दरम्यान, वाझे यांनी याप्रकारणात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ए.एम.पाटील यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय जाहीर केला. न्यायालयाने वाझे याचा अर्ज फेटाळून लावताना खटल्याची ३० सप्टेंबरपासून नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित करून, सचिन वाझेसह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश जारी केले.
- वाझेने अँटीलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या काड्या पेरून स्फोट घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा बनाव आहे. या प्रकरणात पोलीस दलातील शत्रुत्वामुळे मला नाहक गोवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा करताना भारताचा एक नागरिक म्हणून उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंबाबद्दल आदर आहे. अशा परिस्थितीत मुर्खपणाचा गुन्हा करण्याचा विचारही करु शकत नाही, अशी भूमिका घेतली होती.
- यंत्रणेने (एनआयए) जामीन अर्जाला जोरदार आक्षेप घेतला.या गुन्ह्यांमध्ये वाझेचा थेट सहभाग आहे, असा दावा करताना वाझेला जामीन मंजूर झाल्यास तो पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतो, अथवा फरार होऊ शकतो, अशी भिती व्यक्त करू जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली.