
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्येसह खंडणीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या, तसेच त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरीक्षक सुनील मानेला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनीलाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाझेची चौकशी सुरू केली. मनीलाँड्रिंग प्रकरणात वाझेला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज वाझेकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ईडीकडून तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.