
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा झटका देत जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. कदम यांनी जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेची न्यायामूर्ती एम. एस. कर्णिक यांनी दखल घेत सुनावणी २९ नोव्हेंबरला निश्चित करत ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात कदम यांच्या वतीने अॅड. प्रेरणा गांधी यांनी आव्हान देताना जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी अॅड. अमित देसाई यांनी विविध मुद्दे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत ईडीला नोटीस बजावत २९ नोव्हेंबरपर्यंत भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.