रेल्वेचे महिलांना सुरक्षा कवच महिला डब्यात टॉक बॅक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

मध्य रेल्वेचा महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार
रेल्वेचे महिलांना सुरक्षा कवच महिला डब्यात टॉक बॅक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

मुंबई :गेल्या काही महिन्यांपासून धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. वेळोवेळी यावर आवाज उठवूनही रेल्वेकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. दीड महिन्यांपूर्वी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हे रोखणे तसेच गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक बटण बसवण्यात येणार आहे. महिलांच्या ७७१ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ४८० डब्यांमध्ये टॉक बॅक बटण लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या ७७१ डब्यात क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याबाबतच्या खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत १९९ महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, येत्या दोन वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. मध्य रेल्वे मार्गावर सुमारे ५० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी महिला प्रवाशांची संख्या १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात टाॅक बॅक बटन बसवण्यात येणार आहे.

तसेच १५१ डब्ब्यांसाठी खरेदी ऑर्डर आधीच दिली आहे. मध्य रेल्वेवरील ८० डब्ब्यांमध्ये टॉकबॅक सिस्टीम आधीपासूनच कार्यान्वित केली आहे. २०२३ - २४ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय गाड्यांच्या ५८९ डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या मुंबई उपनगरीय गाड्यांच्या १९९ डब्यांमध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे (सीसीटीव्ही) बसवले आहेत. सध्या ३९ महिला डब्यांमध्ये काम सुरू आहे. इन्फ्रारेड (IR) दृष्टी असलेले उच्च प्रतीचे हे कॅमेरे महिला प्रवाशांसाठी वाढीव सुरक्षा देतील तसेच हे कॅमेरे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी प्रतिबंधक ठरतील, तसेच गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासात मदत करतील आणि अलीकडेच बसवलेल्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचे थेट प्रसारण करण्याचीही सुविधा आहे. टॉकबॅक सिस्टम सुविधेमुळे महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत लोकल ट्रेनच्या गार्डशी बोलता येणार आहे. सिस्टीममध्ये एक बटण आहे जे मायक्रोफोनद्वारे गार्डशी बोलण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत . गार्डच्या केबिनमध्ये आणखी एक टॉकबॅक सिस्टीम आहे, जी गार्डला उत्तर देऊ देते आणि नंतर प्रवाशांना त्रास झाल्यास मोटरमनला अलर्ट देणार आहे.

सुरक्षा अधिक सक्षम होणार!

महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅक सिस्टीमची सुविधा बसवल्याने महिला प्रवाशांसाठी सुरक्षा आणि सुरक्षा उपायांना बळकटी मिळेल. असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे .

logo
marathi.freepressjournal.in