संरक्षक रेलिंगअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात!पालकांचा जीव टांगणीला; रास्ता रोको करण्याचा इशारा

या महामार्गावरून जाणारे विद्यार्थी मातोश्री विद्यामंदिर, कुमुद विद्यामंदिर व पाडवा हायस्कूल या शाळांमध्ये शिक्षण घेतात.
संरक्षक रेलिंगअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात!पालकांचा जीव टांगणीला; रास्ता रोको करण्याचा इशारा

मुंबई : पदपथालगत रेलिंग लावण्यात न आल्याने अपघाताची भीती असतानाही जीव मुठीत घेऊन शेकडो पालक आपल्या विद्यार्थ्यांसह दररोज शाळेत ये-जा करत आहेत. रेलिंगअभावी पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे संरक्षक रेलिंग लावण्यास टाळाटाळ केल्यास, शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या महामार्गावर होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमआरआईडीसी) सुमारे ८७ कोटी रुपये खर्चून येथील सायन-पनवेल विशेष महामार्गावरील मध्य रेल्वेच्या गोवंडी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या येथील दोन मार्गिका उड्डाणपुलाचे नुकतेच बांधकाम केले.

या महामार्गावरून जाणारे विद्यार्थी मातोश्री विद्यामंदिर, कुमुद विद्यामंदिर व पाडवा हायस्कूल या शाळांमध्ये शिक्षण घेतात. हे सर्व विद्यार्थी जोतिर्लिंग नगर, डॉ. आंबेडकर नगर व पीएमजीपी कॉलनी या परिसरात वास्तव्यास आहेत. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून जोतिर्लिंग नगरमधील शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश काळगावकर यांनी पदपथासाठी पाठपुरावा केला. परंतु रेलिंगचे काम करण्यात आले नाही, याबाबत त्यांनी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची शिष्टमंडळाला सोबत घेऊन भेट घेतली व त्यांना रेलिंग लावण्याबाबत विनंती केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षित प्रवास करता यावा, याबाबत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन संयुक्त बैठक आयोजित करावी व लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पालकांसह शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

रेलिंग लावण्यापेक्षा क्रॅश बॅरिअर लावणे उचित होईल. ते जास्त सुरक्षित असेल. नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही प्रस्ताव पुढे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करता येईल.

- ऋषिकेश कासार, कनिष्ट अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

आम्ही एमआरआयडीसीच्या मुख्य कार्यालयाला पत्र दिले आहे. याबाबत तेच काय तो निर्णय घेतील. ठरलेल्या कामात रेलिंग नमूद नसल्यामुळे ते काम करण्यात आले नाही. येथील बरीचशी जमीन ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने आपण त्यांच्याशी संपर्क साधावा.

- दत्ता नरावडे, मुख्य अभियंता, रेल्वेकॉन प्रा. लि. मुंबई

या महामार्गावर पूर्वी अपघाताच्या घटना घडल्या होत्या. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता आम्ही पाठपुरावा करत आहोत. या परिसरातील गोरगरीब विद्यार्थी मराठी शाळेत शिकत आहेत. पदपथावर संरक्षक रेलिंगचे काम सुरू न केल्यास स्थानिक रहिवाशी, पालकांसह शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाईल.

- सतीश काळगांवकर, अध्यक्ष, शिवतेज मित्र मंडळ, मानखुर्द

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in