साई रिसॉर्ट प्रकरण

सदानंद कदम यांच्या जामीनाचा फैसला लांबणीवर
साई रिसॉर्ट प्रकरण

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जाचा फैसला लांबणीवर पडला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने 18 जुलैला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.

न्यायाधीश एम. जी. देशपांडे अन्य तातडीच्या प्रकरणांत व्यस्त असल्यामुळे निकालपत्र अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाने सदानंद कदम यांच्यासह दापोलीतील माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यासाठी सुनावणी तहकूब केली.
साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम आणि जयराम देशपांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सदानंद कदम यांनी अ‍ॅड. सचिन हांडे यांच्यामार्फत, तर जयराम देशपांडे यांनी अ‍ॅड. सुबीर सरकार यांच्यामार्फत जामीनासाठी दाद मागितली आहे. त्यांच्या अर्जांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी २६ जून रोजी निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय सोमवारी जाहीर केला जाण्याची शक्यता होती. तसे संकेतही न्यायालयाने दिले होते. मात्र निकालपत्र अद्याप पूर्ण न झाल्यामुळे न्यायाधीशांनी दोघांच्याही जामीन अर्जावरील निर्णयासाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली. सोमवारी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे या दोघांनाही पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in