
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लखोराचा माग काढून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ३० पथके स्थापन केली आहेत, मात्र अद्यापही हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्याचा सुतारकामाचा व्यवसाय असून त्याने हल्ला होण्यापूर्वी दोन दिवस सैफ याच्या घरी काम केले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असून त्याच्याकडे लाल रंगाचा स्कार्फ आणि पाठीवर बॅग असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. तो ‘सतगुरू शरण’ या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उतरत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या फुटेजवरून पोलीस हल्लेखोराचा माग काढत असून अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काही सापडलेले नाही.
दरम्यान, ज्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्याचा सैफवरील हल्ल्याशी संबंध नसल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हल्लेखोराचा माग घेऊन त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसाची ३० पथके स्थापन करण्यात आली आहेत, मात्र अद्याप हल्लेखोराला पकण्यात यश आलेले नाही.
नवा व्हिडीओ
हल्ला करणारा संशयित सैफच्या इमारतीतमधील जिने चढून वर जात असतानाचा एका नवा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. त्याने आपला चेहरा झाकलेला होता आणि त्याच्या पाठीवर बॅग होती, असे नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हल्लेखोर रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला सैफच्या घरात घुसण्यापूर्वी, सावधपणे जिने चढून जात असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. तर गुरुवारच्या फुटेजमध्ये हल्लेखोर रात्री अडीच वाजता सावधपणे जिना उतरत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.
हल्लेखोराचा नवा फोटो समोर
ज्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत, त्याचा नवा फोटो समोर आला आहे. आरोपी मुंबईतच फिरताना आढळून आला असून, त्याने कपडेही बदलल्याचे नव्या व्हिडीओत दिसत आहे. आरोपी घटनेनंतर पसार झाला. याचदरम्यान, त्याने कपडे बदलले. त्यानंतर तो वांद्रे स्थानकावर गेला. जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात संशयित आरोपी हाताची घडी घालून चालताना दिसत आहे. वांद्रे स्थानकाबाहेर तो फिरत होता. त्याचवेळी तो एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. संशयित आरोपीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग आहे. हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी सदर परिसरात चौकशीही सुरू केली आहे.
केवळ चोरी हाच उद्देश
सैफवर करण्यात आलेल्या हल्ल्यात गुन्हेगारी जगतामधील टोळीचा हात नाही, केवळ चोरी हाच उद्देश आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी सांगितले. ज्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे तो कोणत्याही टोळीशी संबंधित नाही. कोणत्याही टोळीने हा हल्ला केलेला नाही, असेही कदम म्हणाले. सैफने आपल्या जीवाला धोका असल्याची सूचना अद्याप दिलेली नाही, त्याने संरक्षणाची मागणीही केलेली नाही, तशी मागणी त्याने केली तर आम्ही कायद्याप्रमाणे पावले उचलू, असेही गृहराज्यमंत्री म्हणाले.
धागेदोरे सापडले, हल्लेखोर लवकरच गजाआड - मुख्यमंत्री फडणवीस
सैफ हल्ला प्रकरणात पोलिसांना अनेक धागेदोरे सापडले असून हल्लेखोराच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे, हल्लेखोर लवकरच पकडला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चेहरा मिळताजुळता
सुतारकाम करणाऱ्या या व्यक्तीचे नाव वारिस अली सलमानी असे असून त्याचा चेहरा सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराशी मिळताजुळता असल्याने त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अज्ञात स्थळी नेले आहे.
सैफला २-३ दिवसांत घरी पाठविणार
सैफ अली खानच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून त्याला दोन-तीन दिवसांत रुग्णालयातून घरी पाठविण्यात येण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. सैफ उपचारांना प्रतिसाद देत असून त्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे, आम्ही त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे, कदाचित त्याला दोन-तीन दिवसांत घरी पाठविण्यात येईल, असे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या पथकाने सैफ याची तपासणी करून त्याला चालण्यास सांगितले. तेव्हा तो आरामात चालत होता, असेही डॉक्टर म्हणाले.