
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणार्या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याला बुधवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ मिळावी यासाठी विनंती केली. विनंती फेटाळून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. काही दिवसांपूर्वी शरीफुल हा सैफअलीच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसला होता. मात्र त्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. पळून गेलेल्या शरीफुलला चार दिवसांनी ठाण्यातून अटक केली. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत होता. कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
'आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे'
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणार्याण शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे दावा अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी केला आहे. तसेच फिंगरप्रिंटचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही अशी माहिती दहिया यांनी दिली.
दहिया यांनी सांगितले की, शरीफुलविरुद्ध वांद्रे पोलिसांकडून भक्कम पुरावे आहे. तो बांगलादेशी नागरिक आहे. त्याच्या बांगलादेशी नागरिकत्त्वाबाबत काही दस्तावेज सापडले आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेने योग्य तपास केला आहे. शरीफुलकडून गुन्ह्यांतील कपडे, चाकूचा तुकडा तसेच इतर साहित्य जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. सैफ अलीच्या फ्लॅटमध्ये सापडलेले आणि आरोपी शरीफुल फिंगरप्रिंट मॅच झाला नसल्याचे काही वृत्त प्रसिद्ध झाले आहे, या वृत्ताचे दहिया यांनी खंडन केले.