Saif Ali Khan stabbing case : अखेर हल्लेखोर गजाआड; सैफच्या हल्लेखोराला ठाण्यात पकडले; पाच दिवसांची पोलीस कोठडी

सिनेअभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात अखेर वांद्रे पोलिसांना यश आले आहे.
Saif Ali Khan stabbing case : अखेर हल्लेखोर गजाआड; सैफच्या हल्लेखोराला ठाण्यात पकडले; पाच दिवसांची पोलीस कोठडी
Published on

मुंबई/ठाणे : सिनेअभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात अखेर वांद्रे पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास असे हल्लेखोराचे नाव असून तो मूळचा बांगलादेशी नागरिक आहे. बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना ठाण्यातून त्याच्या मुसक्या आवळत त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चार दिवसांपूर्वी सिनेअभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ अली खान हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या हल्लेखोराचा शोध सुरू केला होता. त्यासाठी वांद्रे पोलिसांसह झोनमधील काही निवडक अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेच्या शंभरहून अधिक पोलिसांची पथके तयार करून गुन्हेगाराचा माग काढण्यात येत होता.

या पथकांकडून हल्लेखोराची माहिती काढून त्याच्या अटकेसाठी काहींना मुंबई, तर काहींना मुंबईबाहेर पाठविण्यात आले होते. मात्र, आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून या पथकांची चांगली कानउघाडणी केली होती. अखेर शनिवारी या हल्लेखोराविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. तो ठाण्यात वास्तव्यास असून तेथून तो बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलीस पथकाने शनिवारी रात्री ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही कामगारांची चौकशी केली. या कामगारांच्या चौकशीनंतर एका झुडपात लपलेल्या मोहम्मद शरीफुल याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत

पोलीस चौकशीत मोहम्मद शरीफुल यानेच सैफ अली खानवर चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. मुंबईत आणल्यानंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून, तो सात वर्षांपूर्वी भारतात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो ठाण्यातून बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता.

मोहम्मद शरीफुल याला सेलिब्रिटी राहतात त्या परिसराची माहिती होती का, त्याने सैफ अलीवर चोरीच्या उद्देशाने हल्ला केला की या हल्ल्यामागे अन्य काही कारण होते. अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षकाचा कडेकोट पोलीस बंदोबस्त होता, तरीही तो चाकू घेऊन अपार्टमेंटमध्ये घुसला आणि बाराच्या मजल्यावरील सैफच्या फ्लॅटपर्यंत गेला होता. याकामी त्याला कोणी मदत केली का, या हल्ल्यामागे आंतरराष्ट्रीय कटाचा काही संबंध आहे का, पळून जाताना त्याने वाटेत कपडे बदलले होते, त्याने ते कपडे कुठे ठेवले होते, हल्ल्यानंतर त्याने चाकूचा तुकडा कुठे टाकला. तो बांगलादेशातून कशासाठी आला होता, हल्ल्यासाठी त्याने चाकू कोठून आणला होता, पळून जाण्यास त्याला अन्य कोणी मदत केली का, याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी मोहम्मद शरीफुलला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलाकडून न्यायालयात करण्यात आली, तर आरोपीच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावत आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नसून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. के. के. पाटील यांनी मोहम्मद शरीफुलला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अशी झाली अटकेची कारवाई

ठाण्यातील घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीमध्ये हल्लेखोर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु छावणीमध्ये तो आढळून आला नाही.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तब्बल नऊ तास नऊ पोलिसांची पथके हल्लेखोराचा हिरानंदानी परिसरातील खाडीकिनारी शोध घेत होती.

काही वेळेपुरता हल्लेखोराने आपला मोबाइल सुरू केला आणि त्याचे नेटवर्क कांदळवन परिसरात असल्याचे पोलिसांना कळले.

मोबाइल टॉवर लोकेशनच्या मदतीने हल्लेखोराचा शोध घेण्यात पोलिसांना यश

आरोपी मोहम्मद शरीफुल काही वर्षांपूर्वी हिरानंदानी परिसरात मजूर

म्हणून काम करत होता. या परिसराची त्याला चांगली माहिती होती.

हिरानंदानी कामगार छावणीजवळ आरोपी दोन दिवस लपून राहिला होता.

हा संपूर्ण भाग ठाण्यातील अतिमहत्त्वाच्या अशा हिरानंदानी स्टेटमधील लेबर कॅम्पचा परिसर आहे. या ठिकाणी सहजासहजी कुणालाही प्रवेश नाही.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कांदळवन भागामध्ये असलेल्या एका तरुणाची मदत घेतली. परंतु हल्लेखोराने मोबाइल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याचा कांदळवनातील जंगलामध्ये शोध लागणे कठीण झाले होते.

मध्यरात्री त्याने त्याचा मोबाइल काही वेळासाठी सुरू केला. त्यानंतर पोलिसांना त्याचा शोध लागला.

पोलिसांना पक्के लोकेशन मिळाल्यानंतर वेगाने हालचाली करीत त्यांनी आरोपीला झडप घालून अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in