
अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त काही टीव्ही माध्यमांनी दिले आहे. त्यानुसार, सैफच्या घरातील चोरी आणि हल्ल्याबाबत त्याची वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला अखेरचे वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ पाहिले होते. गुन्हा केल्यानंतर त्याने वसई-विरारच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र तोच हल्लेखोर असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताला चौकशीसाठी घेऊन जातानाचा वांद्रे पोलिस स्टेशनच्या बाहेरील व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री २ ते ३ वाजेदरम्यान वांद्रे येथील उच्चभ्रू वसाहतीमधील ‘सत्गुरू शरण’ या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने सपासप सहा वार केले. या हल्ल्यात सैफच्या मानेवर आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिमने मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सैफवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून, एक दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे.
हल्ल्यात त्याच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला. ‘लिकिंग स्पायनल फ्लुएड’वरही उपचार करण्यात आले. डाव्या बाजूला आणि मानेवरील खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी पथकाकडून उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती आता पूर्णत: स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
एक कोटी रुपयांची मागणी : मदतनीसने सांगितला घटनाक्रम
सैफच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या इलियामा फिलीप (५६) या महिलेने हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. आपल्यावर आणि सैफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे म्हटले आहे. हल्लेखोर सैफचा मुलगा जेह ज्या खोलीत झोपला होता तेथे घुसला. प्रथम त्याने आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली, असे त्या म्हणाल्या. फिलीप यांनी विरोध करताच हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा गडबडगोंधळ झाल्याने आयाचे काम करणाऱ्या जुनू जाग्या झाल्या आणि त्यांनी धोक्याचा इशारा दिला. त्यानंतर सैफ आणि करिना तेथे धावत आले. कुटुंबीयांच्या बचावासाठी सैफ सरसावला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि घरातील इतर कर्मचारी येण्यापूर्वीच तो पसार झाला. वांद्रे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून त्याकडे सशस्त्र दरोडा आणि हल्ला या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.