
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. वांद्रे येथील उच्चभ्रू वसाहतीमधील ‘सत्गुरू शरण’ या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील सैफ अली खानच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने सपासप सहा वार केले. या हल्ल्यात सैफच्या मानेवर आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिमने मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सलमानच्या घरावरील गोळीबार, बाबा सिद्दिकींची हत्या यानंतर मुंबईत घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेने मुंबईत सामान्य माणूस तर सोडा, पण सेलिब्रेटीही ‘सेफ’ नसल्याचे दिसून आले आहे. या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
हल्ल्यात सैफच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असून, त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला २ खोल जखमा व दोन किरकोळ जखमा झाल्या आहेत. तसेच अडीच इंचाचे चाकूचे टोक त्याच्या मणक्यातून काढण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती आता स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी गुरुवारी माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले, सैफवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून, एक दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे.
हल्ल्यात त्याच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला. ‘लिकिंग स्पायनल फ्लुएड’वरही उपचार करण्यात आले. डाव्या बाजूला आणि मानेवरील खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी पथकाकडून उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती आता पूर्णत: स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
हल्लेखोर नोकरांच्या ओळखीचा असल्याचा संशय
सैफ याच्यावर हल्ला करणारा आरोपी हा त्याच्या घरातील महिला मदतनीसाच्या ओळखीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिनेच आरोपीला घरात घेतल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. फॉरेन्सिक टीमने सैफच्या घरातून बोटांचे ठसे घेतले असून त्याच्या अहवालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. सैफ राहत असलेल्या ‘सत् गुरू शरण’ इमारतीचे पुढचे गेट उंच आहे. तिथे २४ तास कडक सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, त्याच्या शेजारील इमारतीची सामाईक भिंत तुलनेने फारशी उंच नाही. सैफच्या इमारतीच्या मागची लोखंडी जाळीही तुटलेली आहे. त्यामुळे तिथून हल्लेखोर आत शिरल्याचा अंदाज आहे. तो सैफच्या घरातील महिला मदतनीसाला भेटण्यासाठी आला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. पर्यायाने तिनेच त्याला घरात घेतल्याचेही बोलले जात आहे. हल्लेखोर हा आसपासच्या इमारतीत काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
एक कोटी रुपयांची मागणी : मदतनीसने सांगितला घटनाक्रम
सैफच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या इलियामा फिलीप (५६) या महिलेने हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. आपल्यावर आणि सैफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोराने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे म्हटले आहे. हल्लेखोर सैफचा मुलगा जेह ज्या खोलीत झोपला होता तेथे घुसला. प्रथम त्याने आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली, असे त्या म्हणाल्या. फिलीप यांनी विरोध करताच हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा गडबडगोंधळ झाल्याने आयाचे काम करणाऱ्या जुनू जाग्या झाल्या आणि त्यांनी धोक्याचा इशारा दिला. त्यानंतर सैफ आणि करिना तेथे धावत आले. कुटुंबीयांच्या बचावासाठी सैफ सरसावला तेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि घरातील इतर कर्मचारी येण्यापूर्वीच तो पसार झाला. वांद्रे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून त्याकडे सशस्त्र दरोडा आणि हल्ला या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगार
पोलिसांकडून या हल्ल्याबद्दल महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त गेडाम यांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक केली जाईल. हल्लेखोर हा सैफ अली खान याच्या घरात जिन्याचा वापर करून पोहोचला होता. सैफ याच्या घरात आरोपी चोरीच्याच उद्देशाने घुसल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले. आरोपीला अटक होताच पुढची माहिती दिली जाईल. या आरोपीवर यापूर्वी घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तो सराईत गुन्हेगार आहे.
आरोपीचे छायाचित्र जारी
सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे पहिले छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा आरोपी पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधील एक छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. आरोपी मध्यरात्री २ वाजून ३३ मिनिटे व ५६ सेकंदांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात असे दिसते की हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या ‘फायर एस्केप’ पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यानंतर आरोपीने सैफ याच्यावर सहा वेळा चाकूने वार केले. त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीचे पहिले छायाचित्र पोलिसांनी जारी केले असले तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली - शरद पवार
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली असल्याचे सैफ याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याने स्पष्ट होत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली होती. ही काळजी वाटण्यासदृश स्थिती आहे, राज्य सरकारने विशेषत: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ याच्यावर करण्यात आलेला हल्ला चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
ममता, केजरीवाल,चिरंजिवी यांना धक्का
सैफ याच्यावरील हल्ल्याचा चित्रपट क्षेत्र आणि राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अभिनेता चिरंजिवी यांनी या घटनेने धक्का बसल्याचे म्हटले असून सैफच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई असुरक्षित म्हणणे अयोग्य - फडणवीस
सैफच्या घरात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याचा प्रकार गंभीर आहे, मात्र या घटनेमुळे मुंबई सुरक्षित नाही असे म्हणणे अयोग्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पोलीस कारवाई करीत आहेत, देशाची आर्थिक राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. देशातील महानगरांमध्ये मुंबई शहर सर्वात सुरक्षित आहे, काही वेळा काही घटना घडतात हे खरे आहे आणि त्याचा गांभीर्याने विचारही केला पाहिजे, मात्र अशा घटनांमुळे मुंबई सुरक्षित नाही असे म्हणणे अयोग्य आहे, असेही ते म्हणाले.
फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - पटोले
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू, अशा विधानांचे पालुपद सोडून कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सैफवरील जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वर्दळीच्या वांद्रे भागात या घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे. मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
दया नायक घटनास्थळी
दरम्यान, क्राइम ब्रांचमधील ‘चकमक’फेम अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची सहा पथके कार्यरत असून एक पथक घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे. दुसरे पथक घर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आहे. तिसरे पथक परिसराची पाहणी करत आहे, तर इतर पथके बाजूच्या इमारतींमध्ये चौकशी करून सीसीटीव्हीची पडताळणी करत आहेत.
तैमूर आणि जेह कुठे होते?
या घटनेच्या वेळी सैफ अली खानची पत्नी करिना कपूर आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह घरातच होते, असेही महिला मदतनीसाने पोलिसांना सांगितले. दरम्यान, हल्ल्याच्या दोन तास आधी क्राइम ब्रँच पथकाला हल्लेखोर सैफ याच्या सोसायटीत प्रवेश करताना दिसला नाही. तो आपत्कालीन पायऱ्यांनी घरात शिरला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला ओळखले असून त्याच्या शोधासाठी १० पथके तैनात करण्यात आली आहेत.