
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने अखेर आपण हल्ला केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली. चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसलो, पण घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण सैफवर हल्ला केला, अशी कबुलीही त्याने दिली.
सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पण सैफच्या घरी हा हल्लेखोर इतक्या सहजपणे कसा घुसला? तेवढ्याच सहजतेने हल्ला करून तो तिथून कसा बाहेर पडला? यांसारखे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांसह सर्वांनाच पडले होते. अखेर मुंबई पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
“सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खासगी हाउसकिपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजादने सैफच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. सैफच्या घरी गेल्यानंतर त्याने संपूर्ण घराची रेकी केली होती. शिवाय त्याचवेळी सैफच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन त्याने आखला होता. त्यासाठी त्याने सैफच्या घराचा कोपरा न् कोपरा पाहून घेतला होता. घरात कसे घुसायचे, कुठून घुसायचे हे त्याने त्याचवेळी ठरवले होते,” असे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये काम करताना तो काम संपल्यानंतर या परिसरात पायी चालायचा. एके दिवशी सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताच सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अखेर हल्ल्याच्या दिवशी तो पार्किंग एरियाच्या रस्त्याने फायर एग्झिटजवळ पोहोचला आणि तिथून तो जिने चढून अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचला. तिथे गेल्यानंतर तो डक्ट एरियाद्वारे थेट सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीतील बाथरूममध्ये शिरला, असेही त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे.
बांगलादेशमध्ये कुस्तीपटू
आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशात एक कुस्तीपटू होता आणि कमी वजनाच्या गटात कुस्ती खेळायचा. बेरोजगार असल्यामुळे तो कित्येक वर्षांपूर्वी भारतात आला होता. कुस्तीपटू असल्याने तो सैफ अली खानवर हल्ला करण्यात यशस्वी झाला, असेही त्याने पोलीस चौकशीत सांगितले.