

मुंबई : साकीनाका येथे रस्त्यावरील मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला चार महिने उलटूनही पोलिसांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे, चौकशी अहवाल प्राप्त झाला नसल्याचे कारण देत मुंबई महापालिकेनेही जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी नेमकी कधी पूर्ण होणार आणि नागरिकांना त्याचा अहवाल कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साकीनाका येथे २ जुलै २०२६ रोजी मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबईत तसेच महापालिका प्रशासनात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. रस्त्यावरील मॅनहोलची सुरक्षितता, देखभालीची जबाबदारी आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, घटनेला चार महिने उलटूनही तपास आणि चौकशीचा अहवाल याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शकील शेख यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुंबई पोलीस आणि महापालिकेकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याचे उत्तर दिले. तर, महापालिकेने चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे कळवले. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.
चौकशी अहवाल तयार झाला आहे का?
शेख यांनी या प्रकरणात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. दुर्घटनेप्रकरणी दाखल झालेल्या प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रमाणित प्रत उपलब्ध आहे का तसेच ती अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती त्यांनी मागितली आहे. तपास अधिकारी कोण आहेत, आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली आणि महापालिकेचा चौकशी अहवाल तयार झाला आहे का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.