नर्सिंग होमच्या आडून बालकांची विक्री ; बोगस डॉक्टर, एजंटसह सहा महिलांना अटक

अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नर्सिंग होमच्या आडून बालकांची विक्री ; बोगस डॉक्टर, एजंटसह सहा महिलांना अटक

मुंबई : अनधिकृत नर्सिंगच्या होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात एका बोगस डॉक्टरसह एजंटचा समावेश आहे. गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलबशा मतीन शेख, जुलिया लॉरेन्स फर्नाडिस, सायराबानो नबीउल्ला शेख, रिना नितीन चव्हाण अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ट्रॉम्बे परिसरात एक अनधिकृत नर्सिंग होम असून, तिथे कुठल्याही कागदपत्रांशिवाय बालकांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन महिलांसह एक नवजात बालकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, या बालकाला पाच लाखांमध्ये विकण्यात आले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून इतर आरोपी महिलांना अटक केली. यातील सायराबानो शेख ही बोगस डॉक्टर, तर ज्युलिया फर्नाडिस ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या सहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी बालकांची पाच ते दहा लाखांमध्ये विक्री करत होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता केली जात नव्हती. याच गुन्ह्यांत सर्व महिला पोलीस कोठडीत असून, त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in